Sudheer Joglekar -
Former Resident Editor, Loksatta
1923, 1927, 1932, 1935, 1937, 1941 आणि 2012 या वर्षांना डोंबिवलीच्या सार्वजनिक जीवनात जे महत्वाचं स्थान आहे, त्याची नोंद स. वा. जोशी विद्यालयाचं संकेतस्थळ सुरू करताना, 2022 साली घेणं अत्यावश्यक आहे..
कारण गावाची वस्ती वाढायला लागल्यानंतर गावात शिक्षणाची सोय हवी असं वाटून कै. नानासाहेब गाडगीळ यांचे घरी 1923 साली जे खाजगी वर्ग सुरू करण्यात आले, त्याचं 2023 हे आता शंभरावं वर्ष ठरणार आहे..
1927 ला सुरू झाली लोकलबोर्डाची शाळा.. मुलांना इंग्रजी शिक्षण हवं याची गरज जसजशी जाणवायला लागली, तसतसे ग्रामपंचायतीने शाळेच्या वेळेबाहेर पण शाळेतच इंग्रजी पहिली ते तिसरीचे वर्ग सुरू केले, आणि यू. पी. वैद्य यांची नियुक्ती त्याकामी झाली. ते वर्ष होतं 1932..
1935 च्या जून महिन्यात इंग्रजी चौथीचा वर्ग ज. ए. इ. च्या देखरेखीखाली चालवावा असं गावकऱ्यांनी ठरवलं आणि संस्थेच्या वतीनं कृ. ह. नित्सुरे यांची नियुक्ती होऊन इंग्रजी चौथीचे वर्ग सुरू झाले..
1936-37 मध्ये अळसुंदेकर यांचे घरी पाचवीचा वर्ग सुरू झाला आणि त्या वर्गासाठीचे शिक्षक आदी खर्चाकरता सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली. ही शाळा लोकल बोर्डाने चालवावी असा मूळ विचार, पण माध्यमिक शिक्षण,लोकल बोर्डाच्या कक्षेत नसल्याने कै. ना. वा. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन स्वतंत्र इंग्रजी शाळा स्थापन करण्याचा विचार पुढे आला..
ग्रामपंचायत, सार्वजनिक शिक्षण मंडळ आणि ज. ए. इ. यांच्यात विचारविनिमय होऊन अक्षीकरांनी संस्थेच्या वतीनं वर्गांचा ताबा घेतला तो 1937 साली..
शाळेचं नाव ठरलं इंग्लीश स्कूल डोंबिवली.. मणिलाल ठाकूर यांच्या बंगल्यात भरणाऱ्या शाळेची विद्यार्थी संख्या 200 झाली आणि मोठ्या इमारतीची गरज भासायला लागली, ते वर्षं होतं 1941..
कै. अनंत सखाराम जोशी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ शाळा बांधून देण्याचे प्रयत्न सुरू केले, सरकारकडून दोन गुंठे जागा सारामाफ विनामूल्य मिळवली आणि कै. महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे हस्ते शाळेची कोनशिला बसून नव्या इमारतीत शाळा सुरू झाली ती 1941 जूनमध्ये..
मॅट्रिकचा वर्ग सुरू झाला 1942-43 मध्ये.. 1922-23 ची बॅच ही 80 वी बॅच ठरावी..
2012 हे या वाटचालीतलं अलीकडचं महत्वाचं वर्ष.. या वर्षी स. वा. जोशी विद्यालयाचा अमृतमहोत्सव संपन्न झाला आणि " सवाई " हे उपनाव प्रचलित झालं..
2022-23 सालात आता शाळेची वेबसाईट सुरू होते आहे, साच मजली नवी इमारत पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, शैलेंद्र साळवी आणि डॉ. उल्हास कोल्हटकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शाळा नवनव्या प्रगत मार्गांवर चालते आहे..
या टप्प्यावर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आणि अमृतमहोत्सवी वर्ष समितीचा सचिव या नात्याने मन:पूर्वक शुभेच्छा..